गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

गण्या आणि मी - २: गण्याचे ग्यान

आमचा सातवी पास असलेला गण्या हुशार आहे. माझ्या तर्कातल्या चुका तो अचूक काढतो आणि मला जमिनीवर आणत असतो. आता हेच पहा ना, परवा कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात म्हणे 'सनातन'च्या कुण्या कार्यकर्त्याला अटक झाली. आपला होरा बरोबर ठरला म्हणून पुरोगामी म्हणवणारे माझ्यासारखे खुश झाले. "बघ आम्ही म्हणालो तेच बरोबर ठरले की नाही." गण्याकडून आमची नेहेमीची, बदनामीपुरती खाण्याची पानपट्टी घेता घेता मी त्याला ऐकवले. फडक्याला हात पुसता पुसता गण्या क्षणभर थबकला, मग माझ्याकडे ढुंकूनही न पाहता समोर ठेवलेले पान उचलून त्याला चुना फासू लागला.

चुना, कात वगैरे लावून झाल्यावर आवश्यक ती पंचद्रव्ये त्यात टाकून त्याने ते पान 'शीलबंद' केले आणि आधीच लावून ठेवलेल्या सुमारे तीसेक पानांच्या ओळीत जोडून दिले. पुन्हा एकदा फडक्याला हात पुसता पुसता तो म्हणाला, "तुम्ही पुरोगामी लोक बावळट आहात असं मी म्हणतो ते अजिबात चूक नाही."

गण्या जेमतेम सातवी पास असला आणि माझ्याहून दहा वर्षांनी लहान असला तरी तो मला... मलाच का त्याच्या दुप्पट वयाच्या अनेकांनाही बावळट म्हणण्याचा हक्क राखून आहे.

"म्हणून म्हणत असतो, साल्याहो आधी राजकारण शिका."

मी राजकारणात नसल्याने हा टोला मला नसल्याने मी सुटल्याचा निश्वास टाकला.

"हे राजकारणी तुम्हाला बोल बोल म्हणता घुमवतात. अरे तो समीर गायकवाड हा रेड हेरिंग आहे."

गण्या हा आमच्यासारखाच जन्मजात पुणेकर असल्याने 'हे तुला कसे ठाऊक?' हे विचारण्याचा गाढवपणा मी मुळीच करणार नव्हतो. आणि हे 'रेड हेरिंग' वगैरे तुला काय ठाऊक विचारणे म्हणजे पुढच्या माहितीपूर्ण संवादाला मुकणे नक्की असल्याने मी मुकाट त्याचे पुढचे प्रवचन ऐकू लागलो.

"अरे हे राजकारणी बेटे बेरकी..." गण्या हाती सापडलेल्या बकर्‍याला आता एकदम ठार न करता हलाल करण्याच्या उत्साहाने माहिती सांगू लागला. "तुम्ही लेको बोंबलत होतात ना सनातनच्या नावे, आणि 'वर्ष झाले, दोन वर्षे झाली, अजून कसे खुनी सापडत नाहीत?' म्हणून, मग घ्या तुम्ही म्हणत होतात तस्सा सनातन वाला पकडला पहा. आता गप पडा. तपास होईल, खटला उभा राहिल, यथावकाश पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल. दरम्यान 'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' म्हणत सरकार हात झटकून टाकेल. तो निर्दोष सुटेल तेव्हा सनातनवाले आणि तुम्ही ज्यांना 'भक्त' म्हणता ते कासोटा सुटेपर्यंत नाचतील, तुम्ही कसे हिंदूद्वेष्टे आहात हा त्या घटनेशी संबंध नसलेला आपला निष्कर्ष पुन्हा एकवार बोंबलून सांगतील..." बोलता-बोलताच त्याने लावलेली सारी पानांची चळत करुन एका कागदात बांधली.

ती पुडी रॅकवर ठेवून फडक्याने हात पुसता-पुसता तो पुढे बोलत होता, "...आणि तुम्ही? त्या दरम्यानच्या काळात घडलेल्या अशाच एखाद्या घटनांचा निषेध करण्यात आपली आधीच क्षीण झालेली शक्ती खर्चण्यात व्यग्र असाल. प्रत्येक पुरोगामी पार्टीचा, विद्यार्थी संघटनेचा तेव्हाही आपापला वेगळा मोर्चा असेल. कदाचित तोवर आणखी चार दोन नवे पक्ष वा संघटना उभ्या राहिलेल्या असतील. प्रत्येक मोर्चात दहा ते पंधरा माणसे असतील, प्रत्येक मोर्चा कुठूनतरी सुरू होऊन एस. एम. जोशी फाउंडेशनपाशी किंवा साने गुरुजी स्मारकापाशी विसर्जित होईल."

एक छोटी गोल्डफ्लेक घेण्यासाठी आलेल्या गिर्‍हाईकाला सिगरेट आणि सुटे पैसे देऊन तो पुन्हा माझ्याकडे वळला.

GanyaacheGyaan

"मग एखाद्या पत्रकाराच्या हातापाया पडून त्याची बातमी कुठल्याशा पेपरमधे छापून आणून तुमचे नेते कृतकृत्य होत 'त्या पार्टी'च्या मोर्चात पंधराच लोक होते, आमच्याकडे दोन जास्त आले याबद्दल आपली पाठ थोपटून घेतील. आणि गल्लीबोळातले, तुमच्या त्या फेसबुकवरचे तुझ्यासारखे तज्ज्ञ कधीकाळी कुठल्याशा पुरोगामी वर्तुळात उठबस होती एवढ्या बळावर सगळ्या जगाला अक्कल शिकवणार्‍या नोट्स लिहीत बसतील. "

"साल्याहो, जोवर तुमची संघटना भक्कम नाही, फॉलोअप घेण्याइतकी चिकाटी आणि नेटवर्क उत्तम नाही तोवर तुम्ही प्रत्येक घटनेनंतर टेंबलायचे कर्मकांड पार पाडण्यापलिकडे काही दिवे लावू शकत नाही. आम्ही पानपट्ट्या विकतो पण आमचीही शहरात एकच संघटना आहे. आम्ही सुमारे पंचवीस ते तीस हजार लोक आहोत, मराठी माणसांपासून यूपीच्या भैयापर्यंत सगळीकडून लोक आले आहेत आमच्याकडे. आमच्यांत मतभेद नसतील का? पण अजूनही आमची एकच संघटना आहे. तुम्ही लेको श्राद्धाच्या पिंडासारखे पक्ष नि संघटना काढून आपापल्या विझत्या चुली फुंकत बसलेले आहात..."

गण्या पोटतिडकीने बोलत होता, म्हणूनच मला त्यांला थांबवावेसे वाटले नाही. आणि तो बोलत होत्या त्या तसंही आक्षेप घ्यावा असं काही नव्हतंच. आश्चर्य हे की पानाच्या ठेल्यावर बसून गण्या हे जे सहज पाहू शकतो हे अनेक वर्षे पुरोगामित्वाची दुकानं चालवणार्‍यांना कसं ध्यानात येत नाही? की येतं पण शहाणपणापेक्षा अहंकार अधिक मोठा वाटतो? आपल्या विहित कार्याची सीमा ओलांडून जाऊन भलत्या ठिकाणी तोंड उघडण्याचा किंवा न झेपणारी लढाई लढण्याचा अगोचरपणा ते का करतात?

जोवर या प्रश्नांची उत्तरे ते शोधून काढत नाहीत तोवर एखादा समीर गायकवाड समोर करून त्यांचे तोंड गप्प करण्याचा सोपा उपाय सत्ताधारी वापरत राहतीलच; आणि 'संघटनेवर बंदी घाला' हा जुनाट, कालबाह्य आणि सर्वस्वी अपरिणामकारक उपाय करावा अशी जुनाट मागणी, जुनाट नेत्यांनी करण्यापलिकडे काही घडेल असे वाटत नाही.

"अशा संघटनांच्या चिकाटीने होणार्‍या प्रसाराला जशास तसे उत्तर देण्याची कुवत तुम्ही विकसित करत नाही तोवर तुमच्या चार शिव्यांनी किंवा हातभर लेखांनी त्यांना काही फरक पडणार नाही. अर्थात 'आपण काहीतरी करतो' इतके समाधान स्वतःला देण्यापुरते नि तो 'स्टँप' आपल्या चिकटवहीत लावण्याइतकेच श्रेय तुम्हाला पुरेसे आहे असे असेल तर जे चालू आहे ते उत्तमच आहे. पण मग लेको 'बदल घडत नाही, हे सारे तुमच्यासारख्यांनी चुकीचे नेते निवडल्यामुळे म्हणून.' असे त्याचे खापर फोडायला माझ्याकडे येऊ नकोस."

एक पानपट्टी खाताखाता इतके शहाणपण आले हा बोनसच म्हणायचा. त्या तंद्रीत सुटे पैसे परत घ्यायचे विसरून मी घरी परतलो. माझी खात्री आहे, माझ्या पाठीमागे गण्या गालातल्या गालात हसत असणार.

-oOo-

संबंधित लेखन : गण्या आणि मी - १ : गण्याचे गणित


हे वाचले का?

रविवार, २० सप्टेंबर, २०१५

'हार्दिक'चा राजकीय तिढा

हार्दिक पटेल या बावीस वर्षांच्या युवकाने भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या पटेल-पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेले काही दिवस आंदोलन चालवले आहे. या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांच्या सर्वशक्तिमान होऊ पाहणार्‍या नेतृत्वाला त्यांच्या राज्यातूनच आव्हान मिळाल्याने त्यांच्या आणि पर्यायाने भाजप सरकारच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होतील, याबद्दलही बोलले जात आहे. आंदोलनाचा मुद्दा 'जात' या घटकाशी निगडित आहे आणि म्हणून त्याच्या यशापयशाचा परिणाम गुजरातमधे आणि एकुणच देशाच्या सामाजिक परिस्थितीवर कसा घडेल याचा अभ्यास अनेक समाजशास्त्रज्ञ करतीलच. पण देशाच्या राजकारणावरील दीर्घकालीन परिणामांचा विचार होताना मात्र दिसत नाही.

PatidarAgitation

भारतीय राजकारणावरच्या दूरगामी परिणामाचा विचार करताना दोन महत्त्वाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. पहिला म्हणजे अशा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यांबाबत असलेले राज्यकर्त्यांचे नाकर्तेपण, असलेली बोटचेपी भूमिका. दुसरा अधिक महत्त्वाचा म्हणजे गुजरात हे आणखी एक राज्य स्थानिक राजकारण्यांच्या ताब्यात जाण्याची बळावलेली शक्यता. हा दुसरा अधिक धोकादायक आहे, पण सर्वसामान्यांना हा धोका जाणवत नाही आणि म्हणूनच राजकारणाच्या अभ्यासकांना याची दखल घ्यावी लागणार आहे.

अशा प्रकरणात ठाम भूमिका घेऊन एका जमातीची - गुजरातमधे तर पटेल लॉबीची - नाराजी ओढवून घेण्याचे धाडस कोणताही राजकीय पक्ष करणार नाही हे उघड आहे. तोंडाने ते कितीही शाहू-फुले-आंबेडकरांचे घेत असले, किंवा छप्पन्न इंची राष्ट्रप्रेमाचा ढोल पिटत असले, तरी वास्तवात सामाजिक हितापेक्षा, राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक आणि राजकीय हितालाच प्राधान्य देणारे शासक आपल्याला वर्षानुवर्षे लाभले आहेत, आपणच ते निवडले आहेत हे कटू सत्य आहे.

अन्य राज्यात अशाच स्वरूपाच्या झालेल्या आंदोलनांचे फलित पाहता यातून राजकीय बदल फारसे घडणार नाहीत असा तर्क बहुतेक सारे - प्रामुख्याने शासक - करतील अशी शक्यता दिसते. गुज्जरांचे आंदोलन असो, जाटांचे असो की महाराष्ट्रात मराठ्यांचे असो त्या त्या राज्यांनी अशा आंदोलनकर्त्यांना हवे त्यापैकी बरेचसे देऊ करून अप्रत्यक्षपणे चेंडू न्यायव्यवस्थेकडे टोलवून हात झटकले होते. हा अंगचोरपणा अशा समस्यांना चिघळत ठेवणार आहे आणि त्यातून स्थानिक राजकारणाला बळ मिळणार आहे.

या अंगचोरपणाचे प्रत्यक्ष फलित 'आरक्षणाच्या पातळीवर जैसे थे पण राजकीय पातळीवर लाभ' अशा स्वरूपाचे असेल याची शक्यता मराठे, जाट, गुज्जर यांच्या आंदोलनाचे फलित पाहता दिसते. पण हार्दिक हा त्याआधारे स्वतःचे राजकीय स्थान निर्माण करेल हे आता नक्की झाले आहे. त्याचे बोलविते धनी कोणीही असले, तरी इतका गवगवा झाल्यावर त्या धन्यांच्या तंत्राने तो वागेल याची शक्यता कमी दिसते. सोयीची वेळ येताच त्यांना झुगारून तो स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करेल याची शक्यता बरीच आहे. या शंकेला बळकट करणारे दोन संकेत मिळाले आहेत.

पटेल समाज वर्षानुवर्षे आर्थिक नि राजकीय सत्ता हाती राखून आहे. मोदींच्या उदयानंतर या समाजाला आपले वर्चस्व कमी होत असल्याची भावना निर्माण झाली. किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 'आपला अपमान म्हणजे आपल्या समाजाचा अपमान' या वारंवार वापरल्या जाणार्‍या तंत्राचा वापर करत केशुभाईंसारख्या अडगळीत पडलेल्या बुजुर्गांनी ती रुजवली, असंही असेल. आजवर 'आपल्या मर्जीतले शासन' पुरेसे वाटणार्‍या पटेलांना अधिक असुरक्षितता भासू लागल्याने त्यांची मागणी 'आपले शासन' पर्यंत वाढली असण्याची शक्यता दिसते. याचे संकेत खुद्द हार्दिकनेच दिले आहेत. आपण बाळासाहेब ठाकरेंना आपले आदर्श मानतो, आपण सत्ता राबवण्यापेक्षा रिमोट कंट्रोल हाती ठेवण्याची महत्त्वाकांक्षा राखून आहोत हे त्याने स्पष्ट सांगितले.

इतकेच नव्हे तर हार्दिक हा केवळ गुजरातपुरते राजकीय बस्तान बसवून शांत बसेल असे दिसत नाही. त्याची महत्त्वाकांक्षा देशपातळीवरील राजकारणात आपले वजन निर्माण करण्याची आहे. त्यामुळे तो गुजरातेत पटेल, हरयानामधे जाट, राजस्थानात गुज्जर, महाराष्ट्रात मराठे अशा जातीय समीकरणाच्या माध्यमातून एक नवीच मोट बांधू पाहतो आहे ती बरीचशी तिसर्‍या आघाडीच्या धर्तीवर चालेल अशी शक्यता दिसते. पण ही केवळ जातीय समीकरणाच्या आधारे उभी रहात असल्याने अधिक धोकादायक ठरणार आहे. प्रत्येक जातीने आपापल्या स्थानिक पक्षाच्या माध्यमातून आपल्या राज्यात सत्ताधारी व्हावे आणि देशपातळीवर एकत्र येऊन एक शक्ती म्हणून काम करावे असा काहीसा रोख असेल असे दिसते.

स्वातंत्र्यानंतर गेली कित्येक वर्षे मागास जाती-धर्मांची एकजूट हे सत्ताकारणाचे समीकरण काँग्रेससह, समाजवादी प्रभावाच्या पक्षांनी राबवले. मायावतींनी केलेल्या तथाकथित 'सोशल-एंजिनियरिंग'चा अपवाद वगळता एक वोट बँक म्हणून उच्चवर्णीयांकडे पाहण्याचे धाडस त्या उच्चवर्णीयांच्या लाडक्या भाजपनेही इतक्या उघडपणे कधी केलेले नाही. आज त्याच उच्च जातींना 'आर्थिक मागासलेपणाचा' टिळा लावून हार्दिक नवेच समीकरण जन्माला घालतो आहे. राजकारणात एक प्रकारच्या फेडरल पक्षाची स्थापना करण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने जसे स्थानिक प्रभावाच्या नेत्यांची मोट बांधून एक पक्ष जन्माला घातला तसे काहीसे होईल असे वाटते आहे.

हा सारा खटाटोप करत असताना ही अराजकीय युती असेल, मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही असे तो ठासून सांगतो आहे. महाराष्ट्रात 'शिवसेना' स्थापन करताना बाळासाहेबांनी आणि तमिळनाडूत पेरियार यांनी 'जस्टिस पार्टी' ची स्थापना करताना हीच भूमिका घेतली होती. पण योग्य वेळ येताच त्यांनी आपापल्या संघटनांचे राजकीय पक्षात रूपांतर केले हे विसरून चालणार नाही. तमिळनाडूत आज फक्त स्थानिक द्रविड पक्षांचेच अस्तित्व शिल्लक राहिले आहे, महाराष्ट्रातही काँग्रेसला मागे सारून शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे हे ध्यानात घेतले तर हार्दिकच्या आजच्या वाटचालीची दिशा लक्षात येईल.

या तर्काला पुष्टी देणारा मुद्दा म्हणजे आपली मागणी मान्य न झाल्यास २०१७ मधे राज्यात कमळ फुलू देणार नाही अशी धमकीच त्याने दिली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तो राज्यातील एकमेव पर्याय असलेल्या आणि आधीच क्षीण झालेल्या काँग्रेसला पाठिंबा देईल ही शक्यता धूसरच दिसते. आणि त्याने दिला तरी त्याच्या पाठिंब्यावर उभे राहणे पारंपारिक मागास मतदारांवर उभ्या असलेल्या काँग्रेसला परवडणारे नाही. "आरक्षण व्यवस्थेमुळे आपला देश ६० वर्षे मागे गेला असून त्यामुळे त्याच्या महाशक्ती बनण्याच्या शक्यतेमध्ये अडथळे येत आहेत" असे म्हणणारा हा नेता आरक्षण या व्यवस्थेलाच सुरुंग लावायला निघालेला आहे हे अगदी उघडच आहे. असा निखारा कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पदरी बांधून घेणे तसेही अवघड आहे. तेव्हा त्याची स्वतंत्र राजकीय वाटचाल हा अपरिहार्य परिणाम आहे.

गुजरात हार्दिक पटेलच्या नव्या पक्षाच्या पारड्यात काही प्रमाणात वजन टाकेल आणि तो भाजपाला पर्याय म्हणून उभा राहील आणि अन्य राज्यांत झाले तसे काँग्रेस या राज्यांत अस्तंगत होईल असे दिसते आहे. आज फक्त मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही तीनच राज्ये (जेडीएसचा अपवाद वगळला तर कर्नाटक) प्रभावशाली स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहेत. देशाच्या सर्व बाजूंच्या सीमावर्ती भागात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहेच. तमिळनाडू, तेलंगण, प. बंगाल या राज्यांत भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा मागमूस उरलेला नाही. अन्य राज्यांत स्थानिक पक्ष एकतर सत्ताधारी आहेत किंवा विरोधक तरी. या रांगेत सामील होणारे गुजरात हे मध्यभारतातील पहिले राज्य ठरू शकते.

पण मुळात स्थानिक पक्ष असण्यात काय वाईट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो खासकरून टोकदार अस्मितांच्या काळात जगताना अधिकच प्रकर्षाने! . याला अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे स्थानिक हितांना प्राधान्य, त्यामुळे देशहिताचा दिला जाणारा बळी. आज आपण स्वीकारलेल्या भांडवलशाहीत जसे 'व्यक्तीने आपापले हित जोपासले की देशाचे हित आपोआप होते' असा तद्दत खोटा प्रचार तिचे लाभार्थी करतात तसेच राज्यांची प्रगती झाली की देशाचीही होतेच की असा दावा केला जाऊ शकतो.

पण असा दावा करणारे एक विसरतात की जेव्हा सर्वांना पुरेसे उपलब्ध असते तेव्हा हे कदाचित खरे असेलही, पण जेव्हा एकुण गरजेपेक्षा उपलब्धता कमी असते - आणि बहुधा असतेच - तेव्हा एकुण राष्ट्रीय हिताहितापेक्षा स्वत:चे संस्थान बळकट करण्याकरतात राज्यांच्या स्थानिक क्षत्रपांची रस्सीखेच सुरू होते त्यातून देशाचे हित मुळीच साधले जात नाही. साधनसंपत्तीचे गरजेच्या सर्वस्वी विपरीत प्रमाणात वाटप होण्याची शक्यता बळावते. कारण आता ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त त्याला वाटा अधिक मिळतो, गरजवंताची तशी ताकद नसेल तर त्याला करवंटीदेखील हाती लागत नाही. कारण देशपातळीवर व्यापक दृष्टिकोन घेणे शक्य होत नाही. सारी ताकद स्थानिक खेचाखेचींशी झगडण्यात खर्च होते.

केंद्रात आज विरोधी पक्ष विस्कळित स्थितीत आहेत. काँग्रेसची जोरदार पीछेहाट झाल्यामुळे ज्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे, असे स्थानिक पक्ष आपापली किंमत अधिकच ताठ्याने वसूल करू लागले आहेत आणि भविष्यातही करत राहतील.

संसदेतील गदारोळावर तोडगा म्हणून सपाने भाजपाशी संधान बांधून काय काय पदरात पाडून घेतले ते आपल्याला कळणार नाही. यातून विरोधकांची आघाडी मात्र कमकुवत झाली. पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असलेल्या काळातही असेच प्रकार सपाने केले आहेत. (त्यांना 'समाजवादी पार्टी' ऐवजी 'साटेलोटे पार्टी'च म्हणायला हवे खरे तर.) अशा छिन्नविच्छिन्न विरोधी पक्षामुळे सत्ताधार्‍यांचे फावते, पण तोपर्यंतच जोवर ते स्वतः पुरेसे बळ राखून आहेत!

एकच विरोधी पक्ष असण्यापेक्षा स्थानिक पातळीवरचे बरेच पक्ष असले, की त्यांचे एकत्रित बळ कमी होते नि फोडाफोडीचे राजकारण करून आपले आसन भक्कम करता येते असा भ्रम काँग्रेसने जोपासला होता. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या पक्षांनी अनेक राज्यांतून काँग्रेसलाच हद्दपार केले आहे. याचे कारण म्हणजे हे बहुतेक सारे पक्ष मध्यममार्गी वा समाजवादाकडे झुकणारे होते, त्यामुळे ते काँग्रेसच्याच मतपेढीवर पोसले गेले होते. 'तिसरी आघाडी' नामक खिचडी शिजवण्यात काँग्रेसने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतलेला सहभाग त्यांच्याच मुळावर आला आणि त्यातील लहान लहान तुकडे अखेर त्यांचीच भूमी बळकावून बसले आहेत.

हार्दिक एकीकडे पटेलांना आरक्षण द्या किंवा आरक्षणच रद्द करा अशी मागणी करत एक प्रकारे उच्चवर्णीयांची एकजूट करू पाहतो आहे तर दुसरीकडे गुजरातचा 'बाळासाहेब ठाकरे' होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत गुजरातच्या अस्मितेला फुंकर घालून चेतवतो आहे तर तिसर्‍या टप्प्यात 'हे राज्य हिंदूंचे आहे, मुस्लिमांनी इथे सौहार्दाने रहावे.' असे म्हणत हिंदुत्ववादी मतांना चुचकारतो आहे. या तीन मुद्द्यांचा विचार करता हार्दिकचा स्थानिक पक्ष हा भाजपाच्या मतपेढीवर पोसला जाईल याचे संकेत मिळत आहेत.

पण यातून मोदी किंवा भाजप विरोधकांनी आनंदी होणे आत्मघातकीच ठरेल. ज्या कारणासाठी एकसंध पाकिस्तानचा डोलारा अस्तित्वात असणे भारताला आवश्यक आहे, त्याच कारणासाठी मोदीविरोधकांना गुजरातमधे भाजपाला पर्याय म्हणून आणखी एक स्थानिक पक्ष उभा राहू देणे परवडणार नाही. आधीच क्षीण झालेले त्यांचे बळ आता एकाऐवजी दोन पक्षांशी लढण्यात अधिकच क्षीण होणार आहे, काँग्रेसमधील सत्तातुरांना आता भाजपऐवजी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला तर उंदरांनी बुडते जहाज सोडण्याचा वेग वाढणार आहे.

हार्दिकचे राजकीय यश हे तीन दिशांनी धोक्याची घंटा ठरू शकते. पहिले म्हणजे जातीय ध्रुवीकरण, आजवर पुरोगामी सामाजिक राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेल्यांना विरोध करण्यासाठी तथाकथित उच्चवर्णीयांची आघाडी उभी राहिल्याने समाजात उभी फूट पडू शकते. दुसरे, आजवर स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून बराचसा दूर असलेला मध्यभारतही त्या 'काँग्रेस-गवता'च्या कवेत येतो. आणि तिसरे सर्वात धोकादायक म्हणजे काँग्रेससारख्या मध्यममार्गी पक्षाचे अस्तित्व आणखी क्षीण होत संकुचित स्थानिक वा जातीय पक्ष की धर्माधिष्ठित राजकारण करणारा पक्ष असे दोनच पर्याय आपल्यासमोर राहतात.

म्हणून भाजप आणि काँग्रेस या दोघांनी परस्परसहकार्याने ही नवी डोकेदुखी वाढू नये याची काळजी घ्यायला हवी. हा गुंता मोदींना सोयीच्या प्रकारे सुटावा अशी प्रार्थना मोदीविरोधकांनीही करणे गरजेचे झाले आहे असा गंमतीशीर राजकीय तिढा हार्दिकच्या या आंदोलनाने निर्माण केला आहे.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

नासा म्हणे आता

NasaSayNotUs
  • या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं 'नासा'च्या सूत्रांनी जाहीर केले आहे.
  • त्यातून जे वाचतील त्यांना नोव्हेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे!
  • नासाने मर्मेड्स अथवा मत्स्यस्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून नासाच्या आण्विक संशोधकांनी गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते.
  • नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे.
  • नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
  • संगणक आणि भाषा याबाबत संशोधन करणार्‍या नासा'च्या शास्त्रज्ञांना संस्कृत ही संगणकासाठी आदर्श भाषा आहे असे वाटते...

संस्कृत ही संगणकाला योग्य भाषा आहे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी विचारत आलो आहे की नक्की कशी ती सांग बाबा मला. बहुतेकांकडे यावर उत्तर नसते. मग सोपा उपाय म्हणून कुठल्या तरी देशी लेखकाचा दाखला दिला जातो ज्याने नासाचा दाखला दिलेला असतो. म्हणजे 'मी त्याच्याकडून ऐकले, पुरावे काय ते त्याच्याकडून घ्या' म्हणून झटकून टाकले जाते.

असले अठ्ठावीस इंची छाती फुगून छप्पन इंची झाल्याचा आभास निर्माण करणारे, सनसनाटी दावे व्हॉट्सअ‍ॅप, ईमेल किंवा सोशल मीडियावर शेअर करणारा त्याच मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून त्याची सत्यासत्यता तपासून बघण्याच्या फंदात पडत नाही. कारण हा दावा 'खरा असावा' अशी त्याची इच्छा असते. भाषा, व्याकरण, अंतर्गत वाहतूक, आहारशास्त्र, अंतराळविज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इ. पासून थेट जीवनशैली पर्यंत वाटेल त्या क्षेत्रातील दावे 'नासा'च्या हवाल्याने केला जातात. हे 'नासा' नावाचं प्रकरण नक्की कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करतं असा प्रश्न त्या दाव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांना कधी पडत नाही.

अशा दाव्यांना ताबडतोब आणि वेगाने प्रसिद्धी मिळण्याची बरीच कारणे असतात. एक म्हणजे असे दावे सुप्त स्वार्थी हेतूने, प्रॉपगंडा म्हणून हेतुत: प्रसारित केले जातात. त्यामुळे त्याच्या मागे एक मशीनरी काम करत असते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अशा सोयीच्या बातम्या वारंवार नि विविध प्रकारे प्रसारित करून गोबेल्सने हिटलरच्या नृशंस नि पाशवी महत्त्वाकांक्षांना राष्ट्रप्रेमाची देखणी आणि अभिमानास्पद भासावी अशी झालर प्रदान केली होती. त्याच्या आत्मघाती आणि जनताद्रोही पावलांना नव्या क्षितिजाकडे नेणारी द्रष्टी पावले समजली जावीत इतका बुद्धिभेद सहजपणे साध्य केला होता.

अनेकदा अशा दाव्यांमधे अर्धा भाग खरा असतो आणि अजेंड्याचा भाग हळूच चिकटवून खर्‍याबरोबर खोटे खपवण्याची चलाखी असते. भारत नि श्रीलंका यांना जोडणार्‍या खडकाच्या रांगा समुद्रातळी दिसतात हे उपग्रह छायाचित्रांच्या सहाय्याने नासाने शोधून काढले हे खरे. पण तो रामसेतू आहे हे नासाने सांगण्याचे कारणच नाही. पण सांगताना या दोन गोष्टी जोडून रामसेतूचा शोध नासाने लावल्याचा ग्रह करून दिला जातो, ज्यातून त्या निराधार दाव्याला उगाचच एक शास्त्रीय आधार असल्याचा आभास निर्माण करता येतो.

आणखी एक कारण म्हणजे माणसाला उपजत असलेली सनसनाटीपणाची चूष, जिभेवर सर्पदंश करून घेण्याचे व्यसन असावे तसे सतत हवाहवासा वाटणारा प्रलयघंटानाद किंवा विनाशाची हूल. असा प्रलयघंटानाद रुढीप्रधान देशात अधिक फायदेशीर ठरतो कारण कोणत्याही भीतीच्या आधारे प्रतिगामी लोक आपला निसटू पाहणारा आधार बळकट करत नेत असतात.

तिसरे कारण नव्या जगाचा सतत प्रवाही राहण्याचा अट्टाहास आणि धंदेवाईक गणिते! संगणकावरील व्हायरस नष्ट करण्यासाठी अँटि-व्हायरस प्रणाली विकसित करण्यात आल्या आणि मग त्यांनी जिवंत रहावे म्हणून अशा व्हायरसेसचा पुरवठा चालू ठेवणे अनिवार्य होऊन बसले.

तसेच संगणक माध्यमांना ईमेल, सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना रहदारीचा वेग राखावा लागतो, तरच त्यातून जाहिरातींचे भरपूर पीक काढता येते. अशी रहदारी राखण्यासाठी चटपटीत, चटकन देवाणघेवाण कराव्याशा वाटाव्यात अशा बातम्या सतत प्रसारित केल्या जात असतात. व्यवसाय नि फायदा म्हटले तर खर्‍याखोट्याची, नीतीकल्पनांची चाड बाळगायची नसते हे तर आता सर्वमान्यच झाले आहे.

भूतकाळाबाबत करण्याचे सोयीचे, चलाखीचे दावे करण्यासाठी जुन्या ग्रंथांचा, तथाकथित अभ्यासकांचा आधार घेणे हे नियमित वापरले जाणारे हत्यार आहे. 'अमुक ग्रंथात' सांगितले आहे असे म्हटले की ऐकणारा निश्चिंत होतो नि आणखी शंभर जणांपर्यंत हे पोचवून देतो. ही साखळी दूरवर पसरते नि पाहता पाहता खोट्याला खरे मानले जाऊ लागते. गंमत म्हणजे या सार्‍या साखळीतली एकही व्यक्ती तो अमुक ग्रंथ उघडून पाहण्याची, त्या दाव्याची खातरजमा करून पाहण्याची तसदी घेत नसतो. त्या ग्रंथाचे नावच लोकांना आश्वस्त करण्यास पुरेसे असते. ग्रंथ उघडून पाहण्याचे सोडा मुळात त्या नावाचा ग्रंथ अस्तित्वात आहे की नाही इतकी खातरजमा करण्याची तसदीदेखील घेतली जात नाही.

ग्रीसच्या आर्थिक संकटाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या एका मित्राने कुठल्याशा 'प्रक्षिप्तपुराणा'ने आपल्याकडे या संकटाचे भाकित केल्याचा दावा केला. अतिशय आक्रमक भाषेत आपल्याकडचे इतके ज्ञान तुम्ही नाकारूच कसे शकता असे प्रतिपादन करणारी पोस्ट लिहिली. त्यासाठी त्याने एका संस्कृत पंडित मित्राकडून संस्कृत श्लोक लिहून घेतला, ज्यातून जर्मनीची राणी मेर्केल ही ऐतिहासिक देशाला संकटात लोटील असा अर्थ ध्वनित होत होता.

कायम राष्ट्रप्रेमाच्या ज्वरात जगत असलेल्या अनेकांनी तो दावा सोशल मीडियांतून, व्हॉट्सअ‍ॅपवरून दणादण शेअर केला होता. 'प्रक्षिप्त' नावाचे पुराण अस्तित्वात आहे का याची खात्री करून घेण्याची तसदीही त्यांनी घेतली नव्हती. किंबहुना त्या नावावरूनच हा दावा खोटा असल्याशी शंका खरंतर संस्कृतच्या नावे भंडारा उधळणार्‍यांना यायला हवी होती. यांचे राष्ट्रप्रेम वगैरे किती अडाणीपणाचे असते हे सहज उघड झाले.

नव्या पिढीला अधिक विश्वासार्ह वाटावे म्हणून आता 'नासा'ला वेठीला धरण्यात आले आहे. जसे पुराणग्रंथांची, धार्मिक वा राजकीय नेत्याची साक्ष काढावी तसे 'नासा'ची साक्ष काढली जाते. उद्देश हा की याला तुम्ही आव्हान देऊ नये, ते प्रमाण मानावे. माणसे अधिक खोटारडी झाली आहेत की केवळ माध्यमविस्फोटांमुळे त्यांचे ते खोटारडेपण आपल्यापर्यंत पोचू लागले आहे कोण जाणे. किंवा मुळातच अशा अस्मितेच्या आणि गूढ धोक्यांच्या कथांची, रूढ जगाच्या नियमाबाहेरच्या घटनांची चूष एखाद्या व्यसनाची चटक लागावी आणि त्याची वारंवारता वाढत जावी तसे होते आहे.

ऑस्कर वाईल्ड म्हणाला होता 'एखादा दावा विश्वासार्ह आहे की नाही हे ठरवताना ब्रिटिश माणूस तो दावा करणारा कितपत विश्वासार्ह आहे हे पाहतो.' सांगणार्‍यावर आपला विश्वास असेल तर तो सांगेल तर सत्य मानून चालतो. मग तो सांगणारा आपण स्वीकारलेल्या वा अनायासे मिळालेल्या जात, धर्म, वंश वा देश यांचा स्वयंघोषित ठेकेदार असो, आपल्या राजकीय पक्षाचा अथवा सांस्कृतिक, सामाजिक संघटनेचा नेता असो. त्याने सांगितले की ते खरे आहे असे समजून माणसे मरण्या-मारण्यास सिद्ध होतात. 'आपण कमअस्सल आहोत, योग्य काय अयोग्य काय हे आपले आपण जाणून घेण्याची कुवत आपल्यात नाही हे त्यांच्या मनात पुरेसे ठसवले गेलेले असते.' म्हणूनच एखादे पुस्तक उघडून पाहणे, इंटरनेटसारख्या माध्यमातून शोध घेणे अगदी सहज शक्य असूनही ते करण्याची तसदी माणसे घेत नाहीत.

काही काळापूर्वी एक बोलके छायाचित्र पाहिले होते. एका मोकळ्या जागेत घोडा उभा आहे आणि त्याची साखळी एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधलेली आहे. वास्तविक तो घोडा त्याच्याहून कैकपट हलक्या असलेल्या त्या खुर्चीसकट तिथून निघून जाऊ शकतो, पण जात नाही. कारण गुलामी ही साखळीत नसते तर ती मनात असते. गुलामगिरीविरोधी कार्यकर्ती हॅरिएट टबमन म्हणाली होती 'मी हजारो लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले आहे... आणखी हजारोंना करू शकले असते, पण ते गुलाम आहेत हे त्यांना ठाऊकच नव्हते.'

-oOo-


हे वाचले का?

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

'शेष'प्रश्न

(हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही.)

ShesharaoMore

सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात 'पुरोगामी दहशतवाद' असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि 'स्वतःला पुरोगामी म्हणवणारी' मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे.

परंतु असे असले तरी मोरेंबद्दल माझा आक्षेप आहे, तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्‍या विधानाबद्दल आहे आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे. एरवी यांच्या विद्वत्तेबद्दल मला आदर आहेच. आजच्या काळात इतक्या साक्षेपी नि काटेकोरपणे अभ्यास करणारे फारच थोडे लोक उरलेले दिसतात. तेव्हा त्यांच्या विधानाबद्दल गल्लीबोळात आवाज उठवताना याचे भान राखायला हवे (अर्थात केंद्रात बसलेल्यांच्या भक्तांप्रमाणे 'त्यांना सांगा की' म्हणायचे असेल तर सोडून देऊ.)

मी ९१-९२च्या आसपास प्रथम सावरकरांवरची त्यांची दोन पुस्तके वाचली होती. त्यातील चिकाटी, तर्काचा काटेकोरपणा, विस्तृत विवेचन यामुळे मी प्रभावित झालो होतो. याच पुस्तकांमुळे तथाकथित पुरोगामी मंडळींनी त्यांना सावरकरवादी ठरवून टाकले होते. सावरकर हे हिंदुत्ववादी आणि म्हणून सावरकरवादीही हिंदुत्ववादी या न्यायाने त्यांना अडगळीत टाकले होते.

त्यानंतर त्यांनी आंबेडकरांवर लिहिलेल्या पुस्तकावरून तर यावर शिक्कामोर्तबच झाले. यावरून तर शाहू-फुले-आंबेडकर यांना 'प्रातःस्मरणीय' करून ठेवलेल्या पुरोगाम्यांनी मोरेंचे नावच टाकले. नंतर त्यांनी 'शासनपुरस्कृत मनुवादी: पांडुरंगशास्त्री आठवले' हे आठवलेंचे मूर्तीभंजन करणारे पहिले पुस्तक लिहिल्यानंतरही त्यांना माफ करण्यात आले नाही, 'चार आदर्श खलिफा' (याचे उपशीर्षक बहुधा 'इस्लामचा सुवर्णकाळ' असे होते) हे एका अर्थी हिंदुत्ववाद्यांना डिवचणारे पुस्तक लिहिले तरीही पुरोगामी त्यांच्यावर रुसलेलेच राहिले. 

'अखंड भारत का नाकारला' मधील त्यांची मांडणीही हिंदुत्ववादी गटांना अडचणीची वाटावी अशीच आहे. १८५७च्या उठाव हा 'जिहाद' होता अशी मांडणी केली, तेव्हा कदाचित ती हिंदुत्ववाद्यांच्या थोडी सोयीची झाली असावी. (बहुधा रावसाहेब कसबेंनी किंवा सदानंद मोरेंनी याचा प्रतिवाद करणारा लेख लिहिला होता, सध्या मला याचा संदर्भ आठवत नाही.) त्यांचे विचारकलह, अप्रिय पण (हे अगदीच स्तंभलेखनाच्या पातळीवरचे होते, बहुधा 'सामना'मधे लिहिलेले लेख) हे दोन वाचलेले नाहीत.

जितके आकलन मला झाले त्यानुसार हा लेखक उजव्या मंडळींत मुळीच न शोभणारा आहे. एकदा त्यांची सुरुवात सावरकरांपासून झाली आणि आंबेडकरांवरील तशाच स्वरूपाच्या लेखनात त्यांनी बहुधा आंबेडकरांच्या काही मर्यादांचा उल्लेख केल्यामुळे पुरोगाम्यांनी त्यांना पलिकडे ढकलून दिले.

मुळात सावरकर असोत,मोरे यांच्यासारखे लेखक असोत की तुमच्या आमच्यासारखे सध्याचे नागरिक पुरोगाम्यांची पंचाईत ही आहे की त्यांना एखादा माणूस 'आपला' तेव्हाच वाटतो तेव्हा तो १००% आपला असतो. हिंदुत्ववादी असून 'काही' पुरोगामी विचार मांडणारे सावरकर किंवा सावरकरवादी असूनही मुस्लिमांच्या खलिफांवर लिहिणार्‍या मोरेंची आपल्या सोयीची बाजू तेवढी घेऊन न पटणारी सोडून देण्याचा नीरक्षीरविवेक पुरोगामी 'म्हणवणार्‍यांत' उरलेला नाही. हे काहीसे हिंदूंच्या समुद्रपर्यटनबंदीसारखे किंवा ब्रेड खाल्याने किरिस्तांव झालास म्हणून आपणच आपल्या माणसाला दूर लोटण्यासारखे आहे.

वास्तविक सावरकरांची 'हिंदुपतपातशाही', 'सहा सोनेरी पाने' ही पुस्तके मला मुळीच न पटणारी आहेत पण 'गाय माता असेल तर बैलाची' म्हणणारी त्यांची विज्ञाननिष्ठता, त्यांचे जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, भाषाशास्त्रीय निबंध इ. गोष्टी पुरोगामी लेखकालाही अवाक् करणार्‍या आहेत. पण एका हिंदुत्ववादाने सारं नाकारलं गेलं.

इथे सावरकरांवरचा हिंदुत्ववादी असल्याचा आरोप मी मुळीच नाकारत नाही, त्यांनी माफीनामा देऊन सुटका करून घेतली किंवा गांधीहत्येत त्यांचा सहभाग होता हा दावाही मी क्षणभर खरा मानायला तयार आहे (एरवी तो खरा की खोटा हे मला ठाऊक नाही.) त्यांनी मुस्लिम विरोधासाठी कोणत्याही हत्याराचे केलेले समर्थन घृणास्पद म्हणावे असेच आहे. पण त्या कारणासाठी सावरकरांमधला विज्ञानवादी, साहित्यिक, अभ्यासक नाकारायची माझी तयारी नाही. एखादा खुनीदेखील उत्तम गात असेल तर त्याचा तो गुण नाकारायचे कारण नाही, त्यामुळे तो त्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केला जातो आहे असा कांगावा करायची गरज नाही.

याच चालीवर मोरेंकडेही पुरोगामी वस्तुनिष्ठपणे पाहत नाही हा माझा आक्षेप आहे. तुमच्या मते त्यांचे जे दोष आहेत ते आहेतच, पण पुरोगामी पोरासोरांनी त्यांची लायकी काढत गांधीची लायकी काढणार्‍या अर्ध्या चड्डीवाल्यांच्या रांगेत येऊन बसावे हे चूक आहे. हा सूड आहे किंवा आपणही आपल्या विरोधकांचेच उलटे प्रतिबिंब आहोत याची जाणीव नसणे आहे. हे संघासारख्या मिलिटरी ऑर्गनायजेशनच्या नावे शपथा खाणार्‍यांकडून अपेक्षितच आहे. त्यांच्याकडून वस्तुनिष्ठतेची अपेक्षाच नाही, पुरोगामी म्हणवणार्‍यांकडून ती आहे!

मागे एका पुरोगामी म्हणवणार्‍या तरुण मित्राशी बोलताना कुरुंदकरांच्या विचारव्यूहाचा उल्लेख केला होता. 'हॅ: त्यांनी हिंदुत्ववांद्यांना सोयीची इस्लामविरोधी मांडणी केली होती. पळशीकरांनी कसला धुतला होता त्यांना.' असे तटकन उत्तर आले. त्यावेळी आमच्या बोलण्याचा मुद्दा इस्लामशी मुळीच संबंधित नव्हता. तरीही कुरुंदकरांचे मत लक्षात घेण्याची त्याची तयारी नव्हती.

ही जी 'संपूर्ण नकारा'ची पद्धत पुरोगामी म्हणवणार्‍यांनी स्वीकारली आहे ती सर्वस्वी अ-पुरोगामी आहे आहे माझे मत आहे. एखाद्याने एखादे गैरसोयीचे, न पटणारे मत मांडले की त्याला मुळापासून छाटून टाकण्याची ही अघोरी पद्धतच पुरोगाम्यांचा प्रभाव कमी करत नेण्यास कारणीभूत ठरली आहे. जसजसे एखादे विसंवादी मत येते, तसतसे पुरोगाम्यांची 'श्रद्धास्थाने' कमी कमी होत जातात. अखेर विचारांचे अधिष्ठान असलेले पुरोगामित्व संपून जाते नि जातीय, धार्मिक अस्मितांचे झेंडे घेऊन उभे असलेल्यांप्रमाणेच पुरोगामी म्हणवणारे देखील केवळ झेलकरी होऊन राहतात.

पुरोगामी मंडळींनी उलट सावरकर, मोरे यांचे हिंदुत्ववाद्यांना गैरसोयीचे ठरणारे लेखन वारंवार उद्धृत करत त्यांना खिंडीत गाठायला हवे, तिथे हे त्या लेखनाकडे पाठ फिरवून बसले आहेत. इतके रामबाण हत्यार आपण स्वतःहून हिंदुत्ववाद्यांच्या भात्यात टाकून निष्प्रभ केले आहे याची समज आपल्याला यायला हवी. एक रावसाहेब कसबे वगळले तर अभ्यासपूर्ण प्रतिवादही आज फारसे कुणी करताना दिसत नाही. त्या कसबेंनाही एकाच गैरसोयीच्या मुद्द्यावर आम्ही शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

याउलट अशा लोकांना पुरोगाम्यांनी दूर ढकलणे संघाच्या पथ्यावरच पडते आहे, ते आनंदाने अशा लोकांना मांडीवर घेऊन साखर भरवत आहेत. आजच्या काळात आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे फारच अवघड झाले आहे. 'ते सगळं सोडा, आधी तुम्ही कुठल्या बाजूचे ते सांगा.' असा दम दिला जातो. थोडक्यात सावरकरप्रेम आणि आंबेडकरांवरील तथाकथित टीका या कारणासाठी पुरोगाम्यांनी दूर ढकललेले मोरे हिंदुत्ववाद्यांच्या बाजूला झुकणे ही पुरोगाम्यांनीच निर्माण केलेली अपरिहार्यता आहे. आणि मोरे हे पहिले नाहीत की शेवटचे, नाकारण्याची प्रक्रिया अखंड चालू असते आणि पुरोगाम्यांचा प्रभाव कमी होण्याचीही.

याच्या नेमके उलट मी संघावर टीका करतो हे ठाऊक असूनही अनेक जाहीर नि छुपे संघवादी माझ्याशी वरचेवर चर्चा करू बघतात. पडते घेऊन बोलत माझा ईगो कुरवाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधीतरी मला 'उपरती' होईल नि मी त्या बाजूला येईन असा त्यांना दृढविश्वास असतो. उलट पाहिले तर पुरोगाम्यांचे आणि पुरोगामी म्हणवणार्‍यांचे गट 'माझे पुरोगामित्व तुझ्यापेक्षा अधिक अस्सल आहे.' या मुद्द्यांवर भांडणे करताना दिसतात, तुकडे पाडून परस्परांचा द्वेष करतात.     

फेसबुकसारख्या समाज(?)-माध्यमातून माझ्याशी मैत्री झालेल्या एका गटाचे किमान चार तुकडे मला आज दिसताहेत. हा तर केवळ छोटा आठ दहा माणसांचा गट आहे, पुरोगाम्यांचा राजकीय चेहरा असलेले समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आज कुठल्या परिस्थितीत आहेत हे जगजाहीर आहे.

टीका सहन करतही वैयक्तिक मानापमानापेक्षा 'संघटन' महत्त्वाचे मानणारा संघ आणि 'मीच मोठा पुरोगामी' म्हणत माझे महत्त्व राहील इतका आपला गट लहान करत नेणारे पुरोगामी या दोन दृष्टीकोनातला फरक पाहिला तर संघाचा प्रभाव का वाढता राहतो नि पुरोगामी कायम निर्बळ का राहतात हे लक्षात येईल. आणि याचमुळे आज दोन्ही बाजूंकडे पाहणारे सर्वसामान्य लोक संघाचा प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाकडे नाईलाजाने का झुकले हे ही समजून येईल.

इतकं होऊनही आक्रमकतेने शिवीगाळ वा टिंगलटवाळी करण्यापुरते आपले पुरोगामित्व टिकून राहणार असेल तर राहो बापडे. पण विचारहीनता वाढली की हुकूमशहांना सोयीची भूमी तयार होते, माद्यांसाठी लढताना 'बाहेरील' धोक्यांकडे दुर्लक्ष झालेल्या काळवीटांच्या नरांची शिकार अधिक सोपी होत असते, हे ध्यानात ठेवायला हवे.

- oOo -


हे वाचले का?