शनिवार, २० ऑगस्ट, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ५: फासे पडले नि फासही

रोशच्या कारभाराने अस्वस्थ झालेल्या स्टॅन्ले अ‍ॅडम्सने २५ फेब्रुवारी १९७३ रोजी ई.ई.सी.च्या स्पर्धानियम विभागाचे आयुक्त 'अल्बर्ट बॉर्श' (Albert Borschette) यांना रोशच्या गैरकारभाराबद्दल माहिती देणारं पहिल पत्रं पोस्ट केलं नि या दीर्घ लढ्याला प्रारंभ झाला (सदर पत्र खाली दिलेल्या दुवा क्र. २ वरील दस्तऐवजात वाचता येईल. त्याचबरोबर तेथे त्याने रोश नि अन्य कंपन्यांच्या गैरकारभारासंबंधी अधिक माहिती देणारे दुसरे एक पत्र लिहिले आहे ते ही वाचता येईल.) या पत्रात त्याने आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आपले नाव बाहेर फुटू नये याची काळजी घेण्याची विनंतीही केली होती नि सदर गैरप्रकारांच्या तपासासाठी आपले पूर्ण सहकार्य देऊ केले होते. पुढे त्याने अधिक माहिती मिळवून देऊन आपले आश्वासन पुरे ही केले. आपल्या अधिकाराचा वापर करून ई.ई.सी.चे अधिकारी मागतील ती माहिती गोळा करून त्याने वेळोवेळी ती त्यांना पुरवली. ई.ई.सी.ला आवश्यक ती माहिती पुरवून अ‍ॅडम्सने १९७३ मध्ये रोश सोडली. अर्थात पडद्यामागील हालचाली ठाऊक नसलेल्या रोशने आपल्या महत्त्वाच्या कर्मचार्‍याला अतिशय स्नेहपूर्वक निरोप दिला. यानंतर १९७३ नि १९७४ ही दोन वर्षे ई.ई.सी.चा स्पर्धाविभाग रोशविरूद्ध कारवाईचा आराखडा नि आरोपपत्र तयार करत होते यावरून अ‍ॅडम्सने दिलेल्या अफाट माहितीची नि या एकुण खटल्याची व्याप्ती लक्षात यावी. अ‍ॅडम्सने रोशचा बुरखा फाडण्यासाठी आवश्यक ती सारी मदत ई.ई.सी.ला केली होती. बदल्यात त्याने ई.ई.सी.कडून अपेक्षित ठेवलेली गोपनीयता मात्र ई.ई.सी.ला पाळता आली नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे ई.ई.सी.चे तपास अधिकारी स्वत: स्विस सीमेच्या आत कधीही प्रवेश करत नसत. स्वित्झर्लंडचे कायदे अतिशय जाचक होते. स्वित्झर्लंड हा ई.ई.सी. चा सदस्य देश नसल्याने आवश्यक त्या अधिकृत कागदपत्राशिवाय त्यांना अशी चौकशी करणे, माहिती मागवणे शक्य नव्हते. आणि अशी परवानगी स्विस सरकारकडे मागणे म्हणजे रोशला सावध करण्यासारखेच होते. त्यामुळे जी माहितीची देवाणघेवाण होत होती ती स्विस कायद्यानुसार एका प्रकारे बेकायदेशीर ठरत होती. त्यामुळे स्वतः स्वित्झर्लंडमधे येऊन अ‍ॅडम्सला भेटणं म्हणजे अटकेला आमंत्रण दिल्यासारखेच होते. अर्थात हा सारा धोका या अधिकार्‍यांनी अ‍ॅडम्सच्या नजरेसमोर आणलाच नाही, त्याला सावध केलेच नाही. स्वतः अ‍ॅडम्स हा ब्रिटिश नागरिक असल्याने एक प्रकारे त्याला अ‍ॅम्नेस्टी असल्याचा, आपल्यावरील कारवाई आपल्या देशातील कायद्यानुसारच होऊ शकेल असा काहीसा भाबडा गैरसमज त्याच्या मनात होता. परंतु स्विस कायद्यानुसार त्यांच्या भूमीवर असलेल्या कोणत्याही देशाच्या नागरिकावर स्विस कायद्यानुसारच कारवाई होते हे त्याला माहित नव्हते, ई.ई.सी.च्या अधिकार्‍यांनीही त्याला सांगितले नव्हते. जेव्हा त्याला हे माहित झाले तेव्हा त्याला फार उशीर झाला होता.

१९७३ च्या एप्रिल महिन्या अ‍ॅडम्सने रोश सोडली. यानंतर तो इटलीतील लॅटिना या गावी रहायला गेला. तिथे त्याने स्वतःचे पशुपालन केंद्र चालू करण्याची खटपट सुरू केली. दरम्यान १९७३ नि १९७४ या दोन वर्षात ई.ई.सी. चा स्पर्धानियमन विभाग रोशविरूद्ध आरोपपत्र तयार करत होता. अखेर ऑक्टोबर १९७४ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली. या काळात पॅरिस, ब्रसेल्स येथील रोशच्या ऑफिसेसवर ई.सी.सी. च्या अधिकार्‍यांनी धाड घातली. ई.ई.सी.च्या सदस्य असलेल्या देशातील कोणत्याही कंपनीवर धाड घालण्याचा, माहिती मागवण्याचा हक्क ई.ई.सी.च्या तपास विभागाला ई.ई.सी. नि त्या त्या देशातील करारान्वये मिळालेला असे. अ‍ॅडम्सने दिलेल्या माहितीच्या आधारे नेमकी कागदपत्रे हस्तगत करून त्याद्वारे त्याने पुरवलेल्या माहितीची सत्यासत्यता त्यांना पडताळून पाहता आली. यामुळे या धाडी परिणामकारक ठरून त्यांना भक्कम पुरावे गोळा करणे शक्य झाले. परंतु याचवेळी या अधिकार्‍यांना इतकी नेमकी माहिती आहे हे पाहून रोश सावध झाली नि त्यांना अंतर्गत धोका असल्याची जाणीव झाली. अर्थात हा अंतर्गत धोका कोण ते शोधून काढून त्यावर उपाययोजना करणे हे ओघाने होणारच होते. इटलीमधे असलेला अ‍ॅडम्स आता या सार्‍या घटनाक्रमापासून दूर होता नि रोश आणि ई.ई.सी. यांच्यापासून तो हळूहळू दूर होत चालला होता. पण फासे आता ई.ई.सी आणि रोशच्या हातात होते, ते दान टाकणार होते, डाव रंगणार होता नि अ‍ॅडम्सला नाईलाजाने या खेळात सहभागी व्हावे तर लागणारच होतेच, पण या खेळात सर्वात भीषण किंमतही त्यालाच मोजावी लागणार होती.

१९७४ चा 'न्यू ईयर डे' अ‍ॅडम्सच्या पत्नीच्या बहिणीच्या कुटुंबियांबरोबर साजरा करण्याचे ठरले होते. अ‍ॅडम्स आपली पत्नी नि तीन मुली यांच्यासह ख्रिसमस तिच्या आईवडिलांकडे साजरा करून आपल्या मेहुणीच्या लुईनो या गावी जायला आपल्या गाडीने निघाला. हे गाव स्वित्झर्लंडच्या हद्दीत होते. सीमापार करीत असतानाच अ‍ॅडम्सला अडवण्यात आले. तेथून त्याला जवळच्य असलेल्या ल्युगानो येथील पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. प्रथम हा प्रकार रूटीन स्टेटस् चेकचा असावा असे समजणार्‍या अ‍ॅडम्सला हे काम वेळखाऊ ठरणार आहे हे थोड्याच वेळात ध्यानात आले. त्याने आपली पत्नी नि मुली यांची आवश्यकता नसल्यास त्यांना लुईनोकडे प्रयाण करू देण्याची परवानगी मागितली नि ती मान्य करण्यात आली. ल्युगानो येथे स्विस राजकीय पोलिस विभागाचे अधिकारी - मि. होफर- अ‍ॅडम्सला भेटले. किरकोळ चौकशीनंतर त्यांनी अ‍ॅडम्सला विचारले 'मि. अ‍ॅडम्स तुम्ही हॉफमान-ला-रोश कंपनीसंबंधी काही माहिती ई.ई.सी. ला दिली होती का?' 'हो, दिली होती' या अ‍ॅडम्सच्या उत्तरानंतर ते उडालेच. कारण अ‍ॅडम्स हा ब्रिटिश नागरिक होता त्यामुळे त्याला या कबुलीचे गांभीर्य लक्षात आले नसले तरी याचा अर्थ स्विस कायद्यानुसार अ‍ॅडम्स गुन्हेगार ठरतो हे होफरना चांगलेच ठाऊक होते. या कबुलीने रोशने टाकलेला फास न समजता अ‍ॅडम्स त्यात शिरला होता, एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच तो आपल्या गळ्याभोवती अडकवून घेतला होता.

पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे - वर म्हटल्याप्रमाणे - अ‍ॅडम्स जरी ब्रिटिश नागरिक असला तरी स्विस भूमीवर उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्विस कायद्याप्रमाणेच वागवले जाते. अन्य देशातील नागरिकांना मिळणारी अ‍ॅम्नेस्टी स्विस कायद्यात अस्तित्त्वात नाही. दुसरा मोठा - अधिक गंभीर - मुद्दा म्हणजे स्वित्झर्लंडमधे मोठ्या उद्योगावर केलेला वार हा शासनावर केलेला हल्लाच मानला जातो. यामुळे अ‍ॅडम्स हा स्विस कायद्यानुसार राष्ट्रद्रोही हेर आणि सरकारविरोधी बंडखोर ठरला होता. (याशिवाय दुय्यम कायदेशीर प्रक्रिया देखील ब्रिटन वा अन्य देशांहून वेगळी होती. स्विस कायद्यानुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्याच्या वकिलाची उपस्थिती अनिवार्य नव्हती. एवढेच नव्हे एखाद्या संशयितालादेखील पंधरा दिवसांपर्यंत चौकशीसाठी ताब्यात ठेवण्याची तरतूद कायद्यात होती. शिवाय इथे हेबिअस कॉर्पस् चा कायदाही अस्तित्वात नसल्याने कोणा परिचितालाही संशयिताच्या शोधासाठी प्रयत्न करता येणार नव्हते. सुदैवाने ल्युगानो ते ला स्टँपाच्या तुरूंगाच्या वाटेवर असताना स्वच्छतागृहात जाण्याचे निमित्त करून अ‍ॅडम्सने फोन करून ही सारी हकीकत आपल्या मेव्हणीला कळवली त्यामुळे निदान त्याच्या कुटुंबियांना तरी झाल्या घटनेचा सुगावा लागला. फास पडला होता. आता रोश त्याला आपल्या अधिकारक्षेत्रात - स्वित्झर्लंडमधे - हवा तसा नाचवणार होती. अखेर अ‍ॅडम्सवर स्विस कायद्याच्या १६२ (व्यापारविषयक गुप्तता अटींचे उल्लंघन) नि २७२ (राष्ट्रद्रोह) या दोन कलमांखाली आरोप ठेवण्यात आला.

या सगळ्यात घटनाक्रमाचा परिणाम म्हणजे अ‍ॅडम्सचे कधीही भरून न येणारे एक नुकसान झाले. ते म्हणजे त्याच्या पत्नीचा - मेरिलीनचा - मृत्यू. अ‍ॅडम्सने तिच्या बहिणीला आपल्या अटकेबद्दल कळवल्यानंतर पंधरा दिवस अ‍ॅडम्सच्या सुटकेसाठी जीव तोडून प्रयत्न केला. स्विस सरकारने आज सुटका होईल, उद्या होईल असे झुलवत ठेवून अखेर त्याला बाझल् येथे - रोशच्या बालेकिल्ल्यात - हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यातच तिच्या चौकशी दरम्यान एका पोलिस अधिकार्‍याने अ‍ॅडम्सला किमान वीस वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते हे सूचित केले. या दोन बातम्या ऐकून ती खचलीच. दुसर्‍या दिवशी पहाटेच बाथरूममधे जाऊन तिने गळफास लावून घेतला नि आपली इहलोकीची यात्रा संपवली. इथून अ‍ॅडम्सची कौटुंबिक परवड चालू झाली. (परंतु या लेखमालेच्या विषयाची मर्यादा असल्याने त्याबाबतचे कोणतेही उल्लेख या नंतर येणार नाहीत.)

(क्रमशः)

_________________________________________________________________________________

या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.

१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.

२. SWP 17/87 - Hoffman-La Roche v Stanley Adams - Corporate and Individual Ethics - Eric Newbigging







(पुढील भागातः तुरुंगातून सुटका नि काथ्याकुटांची सुरुवात)

हे वाचले का?